पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील एकाने किरकोळ कारणावरून पत्नी, एक मुलीला डोंगरावर घेऊन जात स्वतःच्या पत्नीचा डोक्‍यात दगड घालून खून करून पत्नीच्या साडीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. यात दाम्पत्याची नऊ वर्षांची चिमुरडी मात्र सुदैवाने बचावली आहे. कोमल संतोष बच्चेवार (वय 9, रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चांडोळा, जि. नांदेड), असे बचावलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी भगवान मद्रेवार (रा. गोंधळेनगर, पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

सणसवाडी येथील संतोष बच्चेवार यांनी पाबळ येथील खैरेनगर भागातील एका महिलेला उसने तीन लाख रुपये आणि संतोष यांची पत्नी ऊर्मिला हिचे काही दागिने दिलेले होते. त्यांनतर महिलेकडे पैसे व सोन्याची मागणी करीत होते; परंतु महिला त्यांना पैसे देत नव्हती. त्यावरून पती-पत्नींमध्ये वाद होत होते. बुधवारी (दि. 17) संतोष हे पत्नीसह महिलेच्या घरी गेले. त्यांचे त्या महिलेबरोबर वाद झाला होता, तेव्हा संतोषविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. संतोष हा पत्नीसह शुक्रवारी (दि. 19) महिलेच्या घरी गेले. त्यावेळी महिलेने त्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे संतोष यांनी पाबळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सणसवाडी येथे येताना संतोष यांनी दुचाकीला बांधलेल्या कॅनमधील डिझेल स्वतःच्या व पत्नी, मुलीच्या अंगावर ओतले; परंतु डिझेलमुळे अंगाची आग होऊ लागल्याने त्यांनी पेटवून घेतले नाही. त्यांनतर पाबळ येथून सणसवाडीजवळ एका डोंगरावर आले. मुलीला म्हणाले की, तुझी मम्मी आणि मी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना सांग. मग पोलीस त्या बाईकडून आपले पैसे काढून देतील. त्यावेळी कोमल डोंगर उतरून खाली येताना तिच्या आईच्या ओरडण्याच्या आवाज आला. तिने पाठीमागे पहिल्यावर तिला तिचे पप्पा आईची साडी काढून घेऊन जाताना दिसले. तेव्हा कोमल ही पळत डोंगरावरून खाली आली. पोलीस ठाणे गाठले.

यावेळी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस उपनिरीक्षक, मनोज निलंगेकर, गणेश वारुळे, शिवशांत खोसे, पोलीस नाईक विलास आंबेकर, योगेश नागरगोजे, हेमंत इनामे, दत्तात्रय शिंदे, संजय ढमाल, कृष्णा कानगुडे, अविनाश पठारे, नीरज पिसाळ, अमोल लांगी, संजय ढावरे आदींनी मुलीला घेऊन डोंगरावर धाव घेतली. त्यांना डोंगराच्या पायथ्याला संतोष व पत्नी मृतावस्थेत आढळले. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)