अरबीसमुद्रात चक्रीवादळ; अतिवृष्टी संदर्भात सतर्कतेचा इशारा

पुणे: सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचापट्टा निर्माण झाला असून त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असतानाच आता या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हे चक्रीवादळ २५ ऑक्टोबरला पूर्व-उत्तरपूर्व म्हणजेच महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची चिन्हे असून, हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अनुषंगाने २४ आणि २५ ऑक्टोबरला कोकण व पुणे विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान मुंबईसह पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्रप्रदेशाच्या किनारी प्रदेशात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय ओरिसाच्या किनारीही पाऊस कोसळेल. कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारीही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.