दिल्ली – जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत घट करण्यात आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी मागील महिन्यात 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतीत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसची किंमत 1856.50 रुपये होती.
मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे, तर दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1773 रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याआधी मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सध्या घरगुती एलपीजीच्या किमती मुंबईमध्ये 1102.05 रुपये आणि दिल्लीमध्ये 1103 रुपये इतका आहे.