नवी दिल्ली – चार तरुण समुद्राच्या खाडीत आंघोळीसाठी गेले होते. पोहता पोहता ते चारही जण खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. किनाऱ्यावर असलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. अशात स्थानिक भाजप आमदाराने त्या ठिकाणी जाऊन मुलांना वाचवल्याचे समजते. गुजरातमधील राजुला येथील पटवा गावात ही घटना घडली.
राजुला येथील स्थानिक भाजप आमदार हीरा सोळंकी हे बाजूला होते त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या मुलांना वाचवण्यासाठी थेट समुद्रात उडी मारली. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या मदतीने त्यांनी पाण्यात असलेल्या तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढले.मात्र, यामध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. तरुण खोल पाण्यात बुडाला होता, त्याला शोधण्यासाठी 2 तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. यानंतर चौथ्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
राजोला येथील पटवा गावातील कल्पेश शियाळ, विजय गुजरिया, निकुल गुजरिया आणि जीवन गुजरिया असे चार मित्र आहेत. हे सर्वजण गावाजवळील समुद्रकिनारी असलेल्या खाडीत आंघोळीसाठी आले होते.
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते सर्व समुद्राच्या खोल भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले.वाचवा वाचवा अशा आर्त हाका हे तरुण देत होते. सुदैवाने आमदार हिरा यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे यातील तिघांना वाचवण्यात यश आले.यानंतर भाजप आमदाराचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर देखील आमदारांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.