हवाना : क्युबा च्या दक्षिण भागांमध्ये समुद्रकिनारी प्रदेशांमध्ये खेकड्यांनी प्रचंड प्रमाणात दहशत माजवली आहे. घराच्या अंगणात रस्त्यावर कार्यालयांच्या जिन्यांमध्ये जिथे पहावे तिथे सर्वत्र खेकडे दिसत असल्यामुळे नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या लाखो खेकड्यांमुळे हा प्रश्न उद्भवला आहे. लाल पिवळा आणि काळा रंगाचे हे खेकडे रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावरही दिसत आहेत आणि घराच्या अंगणातही दिसत आहेत. गर्दीच्या रस्त्यावरही एकाच वेळी शेकडो-हजारो खेकडे रस्त्यावरून चालताना दिसत असल्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवणे अवघड झाले आहे.
अनेक वाहन चालक या खेकड्यांना चिरडून वाहने नेत आहेत. पण खेकड्यांच्या टोकदार नांगीमुळे अनेक वाहन चालकांचे टायरही पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रदेशात काही दिवसापूर्वी पाऊस झाल्यानंतर जमिनीत लपलेले हे सर्व खेकडे बाहेर पडले असून त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे.
एकाच वेळी हजारो खेकडे दिसत असल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात भीतीही वाटत आहे. हे खेकडे कुठे येतील आणि कुठे दिसतील याबाबत कोणतीही शाश्वती नसल्यामुळे लोकांना खूपच काळजी घेऊन दैनंदिन व्यवहार करावे लागत आहेत.
पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, करोना कालावधीमध्ये देशातील खेकड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असताना त्यांची ही संख्या अतिशय भीतीदायकपणे समोर येत आहे. या समस्येवर मार्ग कसा काढायचा याचा विचार आता क्युबाचे पर्यावरण मंत्रालय करत आहे. ठोक क्युबाचा दक्षिण प्रदेशांमध्ये सध्या ही समस्या सतावत आहे. देशात इतरत्रही ही समस्या पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.