कॉंग्रेसच्या राजवटीतच पाकिस्तानचे दोन तुकडे

भुपिंदरसिंह हुडा: भाजपच्या राष्ट्रवादाला प्रत्युत्तर

चंडीगढ : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपिंदरसिंह हुडा यांनी गुरूवारी राष्ट्रवादाचे मुद्दे लावून धरणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर दिले. भारताला कॉंग्रेसनेच स्वातंत्र्य मिळवून दिले. कॉंग्रेसच्या राजवटीतच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपकडून राष्ट्रवादाशी संबंधित मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यावरून पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना हुडा यांनी भाजपवर पलटवार केला. देशातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मुद्दे वेगवेगळे असतात.

विधानसभा निवडणुकांत स्थानिक मुद्‌द्‌यांना महत्व असते, अशी टिप्पणी त्यांनी केली. अधिक जागा जिंकून हरियाणाची सत्ता राखण्याचा विश्‍वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. त्याबाबत बोलताना हुडा म्हणाले, हरियाणातील वारे बदलले असून कॉंग्रेसला अनुकूल लाट आली आहे.

आमच्याकडे मोदी फॅक्‍टर चालणार नाही. हरियाणातील भाजप सरकारच्या अपयशाबाबत जनता बोलत आहे. सुज्ञ जनता आता विचलित होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्राबरोबरच हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.