पुणे -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुणे विभागाच्या निकालात सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली आहे. विभागाचा एकूण निकाल 93.34 टक्के आहे. मात्र, राज्यात विभागनिहाय निकालात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 94.59 टक्के, अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 93.66 टक्के तर पुणे जिल्ह्याचा निकाल 92.66 टक्के लागला आहे. पुणे विभागात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 95.68 टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल 91.43 टक्के लागला.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी निकालाची माहिती दिली. पुणे विभागात 2 लाख 42 हजार 734 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 40 हजार 692 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 2 लाख 24 हजार 665 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
रीपीटर्समध्ये अहमदनगर वरचढ
पुणे विभागाचा रीपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 46.39 टक्के लागला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा सर्वाधिक 47.53 टक्के, पुणे जिल्ह्याचा 46.29 टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा 45.24 टक्के निकाल लागला आहे. विभागात 6 हजार 695 पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 6 हजार 651 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर 3 हजार 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुले पडली मागे…
पुणे विभागात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 95.68 टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल 91.43 टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 96.87 टक्के इतका निकाल लागला. त्यानंतर कला शाखेचा 86.14 टक्के, वाणिज्य शाखेचा 92.81 टक्के, व्होकेशनल अभ्यासक्रमाचा 92.95 आणि टेक्निकल सायन्सचा निकाल 93.02 टक्के लागला आहे. पुणे विभागात 22 हजार 468 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच 72 हजार 693 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 1 लाख 3 हजार 728 विद्यार्थ्यांना द्वितीय आणि 25 हजार 776 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली आहे. विभागात 137 विषयांपैकी 34 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच 23 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. विभागात केवळ 1 गैरप्रकाराची नोंद झाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात इंदापूरचा निकाल सर्वाधिक
बारावीच्या निकालात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मावळ तालुक्याचा लागला आहे. पुणे शहर-पश्चिमचा 88.64 टक्के, पुणे शहर-पूर्वचा 88.24 टक्के तर पिंपरी-चिंचवडचा 93.28 टक्के निकाल लागला आहे.