चोरी, गळतीसारखे गंभीर प्रकार रोखण्याचे आव्हान महावितरणपुढे आव्हान
पुणे – ग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. पण त्याआधी वीज चोरी, गळतीसारखे गंभीर प्रकार रोखण्याचे आव्हान आहे. आजही राज्यभरातील बहुतांशी भागात विजेच्या खांबांवर आकडे टाकून वीज घेण्याचे प्रकार सरार्सपणे सुरू असतात. मात्र, वीज चोरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महावितरणे ठोस पावले उचलली नसल्याने कारभार चव्हाट्यावर येत आहे.
ठेकेदार मोकाट; ग्राहक संकटात
मीटरचे रीडिंग व्यवस्थित घेतले जात नसल्याने ग्राहकांना जादा आकार पडत आहे. रीडिंग नेणाऱ्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा फटका ग्राहकांना बसत असल्याने एजन्सींवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच, वीज चोरणाऱ्यांवर कारवाई व्हावी. असे प्रकार घडत असतानाही महावितरण कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप तज्ज्ञांनी केला आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी
बागायती शेती पट्ट्यात आकडे टाकून होणाऱ्या वीज चोरीची माहिती असूनही कारवाईस टाळाटाळ केली जाते. वीज चोरट्यांवर कारवाई सोडून नियमाप्रमाणे बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या रीडिंगमध्ये बदल करत जादा पैसे आकारले जातात. त्यामुळे “चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार महावितरणकडून घडत आहे.
राज्यात 36 हजार कोटींवर थकबाकी
राज्यात विजेचे आर्थिक गणित कोसळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये वीज थकबाकी हे प्रमुख कारण आहे. सध्या राज्यात 36 हजार कोटींहून वीज थकबाकी आहे. त्यामुळे ती वसूल करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
अशी केली जाते वीज चोरी
सी.टी. रेझिटन्समध्ये बसवणे
मीटर सी.टी. रेझिटन्स बसवण्याचा प्रकार असतो. यामध्ये महावितरणकडून ग्राहकाला पाहिजे तेवढी वीज मिळते. मात्र, वीज मोजण्यासाठी सी.टी. असल्याने रेटिझन्सकडून मीटरची गती कमी होते. त्यामुळे वापर केलेल्या विजेच्या 20 ते 25 टक्के वीज देय येते.
फ्युज काढून वायर बसवणे
जेथे जुन्या पद्धतीचे मीटर आहेत, तेथे फ्युज काढून वायर बसवण्याचा प्रकार जास्त आढळून येतो. यामध्ये मीटरमधील दोन फ्युज काढून एकच वायर दोन्ही फ्युजच्या खालील कंटेनरमध्ये टाकून वीज सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे किमान 50 ते 60 टक्के देय रक्कम येते.
सी.टी. वायर कट करणे
मीटरमध्ये बसवलेल्या सी.टी.ची केबल कट करुन वीज घेण्याचे प्रकार सरार्सपणे केले जातात. मीटरमागे छिद्र पाडून वायरने थेट कनेक्शन घेतले जाते. यामुळे साधारण 40 ते 50 टक्के वीज देय येत असल्याचे समोर आले आहे.