शिरूर -पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यामुळे अनेक वाहनचालक, दुचाकीस्वारांना आपले जीव गमवावे लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आणखी किती जणांना मिळणार त्या पाण्याची शिक्षा? असा संतप्त सवाल नागरिक, वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
पुणे-नगर महामार्गावर शिरूर ते पुण्यापर्यंत वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील यश इन चौक, कारेगाव, सरदवाडी, बोऱ्हाडे मळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहे तर साचलेले पाणी उडून अनेक वेळा वाहनांचे अपघात होत आहेत. अनेक जण यामुळे जखमी झाले तर काही जणांचे यात बळी गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत अनेकवेळा तोंडी व लेखी तक्रार करण्यात आली आहे.
परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शुक्रवारी (दि. 24) रात्री शिरूर येथील बोऱ्हाडेमळा जवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. शिरूर येथे पुणे-नगर या मार्गावरील ज्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते. त्या ठिकाणी त्वरित स्लोप करून हे पाणी काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
पुढील काळात पाणी साचून शिरूर पुणे महामार्गावर अपघात झाले तर अपघातानंतर या सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक कैलास भोसले यांनी दिला आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही रस्त्यावर पाणी तसेच साचून राहात आहे. यामुळे खूप अपघात होतात. बोऱ्हाडेमळा, सरदवाडी, कारेगाव, यश इन चौक, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावभीमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येते. पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या वाहनचालकाला माहीत नसते. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होत आहेत.
– विनीत बोरा, नागरिक, शिरूर शहर.
पुणे-नगर रस्त्यावर शिरूरपर्यंत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने हॉटेल, शोरुम यांनी साईडपट्ट्या वाढवल्याने त्यांच्या भागातील पाणी या ठिकाणी साचत आहे. त्या ठिकाणी या पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्या काढून त्याचा निचरा करण्याचे आदेश शिरूर येथील शाखा अभियंता नवनाथ शेळके यांना दिले आहेत.
– उज्ज्वला घावटे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.