कोट्टायम – केरळमधील कोट्टायम येथे एका ज्येष्ठ व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी दिवसभर विरोध केला. त्यामुळे रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी उरकण्यात आला.
मुट्टमपुलम येथील सार्वजनिक स्मशानभूमीत एका 83 वर्षीय करोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहास अंत्यविधीस स्थानिक नागरिकांनी मनाई केली. यामुळे एका स्थानिक नेत्याविरोधात आणि अन्य 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, नागरिकांनी घातलेल्या गोंधळामध्ये अंत्यविधी रात्रीच्या वेळी सव्वा अकरा वाजता कोविड-19च्या नियमावलीनुसार करण्यात आला.
करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्याऐवजी स्थानिकांनी त्यांच्या परिसरात करोना पसरण्याच्या भीतीमुळे यास विरोध केला. या लोकांनी मृतदेहाचा रस्ता रोखून धरला होता. त्यांचा आरोप आहे की, संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाला चर्चने जागा न दिल्याने तो मृतदेह या स्मशानभूमीत आणण्यात आला.