पुणे -दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाकडून निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, महापालिकेत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने पालिका प्रशासनाकडून तातडीने मागविली असून, पालिकेने 15 अधिकाऱ्यांची माहिती कळविली आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, लोकसभेची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच 29 मार्च 2023 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. तर नियमानुसार, लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्या ठिकाणी निवडणूक घेतली जाते. तर लोकसभेची मुदत संपण्यास अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाने तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून राजपत्रित अधिकाऱ्यांची यादी मागविण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या भेटीने चर्चेला उधाण
दरम्यान, एका बाजूला प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असतानाच; दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बापट यांचे पुत्र गौरव बापट यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून पोटनिवडणूक जाहीर झाल्यास बापट यांच्या घरातील उमेदवारालाच संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, खासदार बापट यांच्या घरात उमेदवारी दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल त्यासाठीही प्रयत्न करणे भाजपला सोपे जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.