पुणे – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळाल्यामुळे राज्यातील शिंदे-भाजप सरकार कायम राहणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सारसबागेसमोरील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयासमोर पेढे वाढत तसेच ढोल-ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सारसबाग चौकात मोठी गर्दी केली होती.
शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अजय भोसले, युवा सेना सचिव किरण साळी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर शहर भाजपच्या वतीनेही सारसबागेसमोरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या बाहेर जल्लोष साजरा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
सत्ता संघर्षाचा निकाल असल्याने सकाळपासूनच्या शिवसेनेच्या कार्यालयासमोर गर्दी होती. त्यानंतर जसजसे निकालाचे वाचन सुरू झाले तशी गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, जसजसे निकालाचे वाचन सुरू झाले तसतशी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निकालाचे स्वागत करून जल्लोष साजरा केला.