नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून राज्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे अजूनही लसी मिळत नाहीत. लस पुरवठा कमी झाल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. पण देशातल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये मात्र विकतची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांना लसींचा पुरवठा कसा होतो, असा सवाल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, 18 ते 44 या वयोगटासाठी जून महिन्यात लस पुरवठा केला जाईल, असे केंद्र सरकारने आम्हाला सांगितले आहे. 10 जून नंतरच या गटाला लसीकरणासाठी लस उपलब्ध होणार असल्याचे केंद्र सरकारकडून कळवण्यात आले आहे. दिल्लीत या वयोगटातील 93 लाख नागरिक आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी 1 कोटी 84 लाख डोसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे.
पण केंद्र सरकारने एप्रिलमध्ये आम्हाला साडेचार लाख आणि मे महिन्यात 3 लाख 67 हजार डोसेस उपलब्ध करून दिले आहेत. या वयोगटासाठी आम्ही 8 लाख 17 हजार डोस प्रत्यक्ष उत्पादकांकडून उपलब्ध करून घेतले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
लसींच्या साठ्यावर केंद्र सरकारने कब्जा केला असून राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा होत नसताना खासगी रुग्णालयांना मात्र ही लस सुकरपणे उपलब्ध होते आहे हा काय प्रकार आहे असा सवाल त्यांनी केला आहे. खासगी रुग्णालयात 900 ते 1100 रुपये या प्रमाणात लसींची विक्री केली जात आहे.