Hasan Mushrif – खासगी दवाखान्यात 5 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या रुग्णालयांनी लहान मुलांना सरकारी रुग्णालयात शिफ्ट करायला लावले. या सर्व शिफ्टींगमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
त्यामुळे नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. नांदेड मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.
यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील आता समोर आला आहे. या प्रकरणात चौकशी समिती नेमली असून काही महत्वाचे कठोर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे.
सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि डॉक्टरांच्या बदल्यांबाबत सरकार निर्णय घेत असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली. नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर उद्या राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे.
या घटनेत 10 लहान मुलांचे मृत्यू झाले होते. या मृत्यूला खासगी दवाखाने जबाबदार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. खासगी दवाखान्यात 5 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या खासगी रुग्णालयांनी अत्यवस्थ लहान मुलांना सरकारी दवाखान्यात दाखल करायला सांगितले होते, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
4 दिवसांत मृत्युंचे अर्धशतक
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्युचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासांत आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे 4 दिवसांत मृत्यूचे अर्धशतक झाले आहे.
2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. अपुरा औषध साठा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.
त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबर रोजी 6 जणांना जीव गमवावा लावला होता. तर गुरुवारी 5 ऑक्टोबर ला मागील 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे 4 दिवसात मृतांचा आकडा 51 वर पोहचला आहे.