पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – पीएमआरडीएकडून घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या घरांची किंमत ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. घरांचे दर अधिक वाढीव दाखविले आहेत. शहरातील गोरगरीब, कष्टकरी लोकांना या प्रक्रियेतून बाहेर पडायला भाग पाडणाऱ्या तसेच व्यावसायिकदृष्ट्या विक्री होणाऱ्या गृहप्रकल्पास त्वरित स्थगिती द्या, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या वेळी उपायुक्त बन्सी गवळी व आयुक्त राहुल महिवाल यांच्या निर्णयाच्या चौकशीची मागणी केली आहे.
वास्तविक पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत हे घरे अल्प दरात देणे गरजेचे असताना पूर्वीचे प्राधिकरण आणि आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे यांनी पेठ क्रमांक 30 व 32 येथे 792 निवासी सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1 आरके एकूण 378 सदनिका या 25.52 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या म्हणजेच 274 स्क्वेअर फुट घराची किंमत 18 लाख 80 हजार 824 रुपये म्हणजे प्रति चौरस फुट दर 6 हजार 864 होतो. तर अल्प उत्पन्न, एलआयजी गटासाठी 1 बीएचके सदनिका 34. 57 चौरस मीटरच्या एकूण 414 सदनीका म्हणजेच 371 चौरस फुट सदनिकेची किंमत 24 लाख 47 हजार 899 रुपये आहे. म्हणजेच प्रति चौरस फुट दर हा 6 हजार 597 रुपये असा आहे. प्राधिकरणाकडून मागील वर्षी 7 लाख 40 हजार इतक्या योग्य दरात सदनिका देण्यात आल्या. परंतु आता मात्र गरीबांनी या प्रकियेतच सहभागीच होऊ नये अशा प्रकारे दर आकारण्यात येत आहेत. हे दर रद्द करून पूर्वीच्या दराने च सदनिका द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, इरफान चौधरी, नाना कसबे, राजेश माने, माधुरी जलमुलवार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.