पिंपरी -माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे (आयटी) केंद्र असलेल्या महानगरांमधील घरांच्या दरवाढीमध्ये वाकडने देशातील नामांकित शहरांना मागे टाकले आहे. गेल्या तीन वर्षांतील गृह खरेदी-विक्री बाजारपेठेतील दरवाढीचा उच्चांक पाहिला तर वाकडमधील घरांच्या दरांमध्ये झालेली वाढ दिल्ली (एनसीआर), चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू, कोलकत्ता या शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असा अहवाल बांधकाम क्षेत्रातील अनारॉक रियल इस्टेट संस्थेने दिला आहे. विशेष बाब म्हणजे वाकड येथील घरांच्या दरवाढीची टक्केवारी इतर शहरांच्या तुलनेत कमी असली तरी दर मात्र अधिक आहेत.
सलग दोन वर्ष कोविड 19 संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने गृह निर्माण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील बाजारपेठा थंडावल्या होत्या. कोविडच्या प्रादुर्भावामुळे भविष्यातील प्रगतीचा अंदाज बांधणे सर्वांसाठीच कठीण बनले होते. यामुळे बहुतांश बांधकाम प्रकल्पातील बांधून तयार असलेली घरे घेण्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे करोडो रुपयांची गुंतवणूक करुनही बिल्डरांना मंदी ओसरण्याची वाट पहावी लागली. परंतु, कोविडची लाट ओसरताच बांधकाम क्षेत्राने उसळी घेतल्याने नवनवीन प्रकल्प लॉन्च करण्याकडे बिल्डरांचा कल वाढला. आजरोजी घरांच्या किंमती वाढल्या असल्या तरी ग्राहक घर खरेदी करण्यास पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड हे नियोजनबध्द शहर असल्याने या शहरात स्वतःचे घर घेण्यासाठी राज्यतीलच नव्हे देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या नागरिकांचा कल वाढल्याचे पहायला मिळत आहे.
वाघोली, हिंजवडीलाही टाकले मागे
तीन वर्षांत वाकडमधील घरांच्या किंमती 19 टक्क्याने वाढल्या आहेत. दरवाढीमध्ये वाकडने पुण्यातील वाघोली, हिंजवडीच नव्हे तर देशातील बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता आणि राजधानी दिल्लीलाही (एनसीआर) मागे टाकले आहे. वाकड येथे प्रति चौरस फुटासाठी 7 हजार 795 एवढी दरवाढ झाली आहे. कलकत्ता येथे प्रति चौरस फूटासाठी 7 हजार 710 रुपये तर, बेंगळुरु येथे प्रति चौरस फूट 7 हजार 425 एवढी दरवाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील वाघोली येथे 25 टक्के दरवाढ झाली असून प्रतिचौरस फुटासाठी 6 हजार 5 एवढी वाढ झाली आहेत. तर, आयटी पार्क हिंजवडी येथील घरांचे दर 22 टक्क्याने वाढले आहेत. येथे प्रति चौरस फुटासाठी 6 हजार 835 एवढे दर मोजावे लागतात.
मागील तीन वर्षांतील दरवाढ
शहर स्क्वेअर फुटाचे दर 2020 ते 2023 दरवाढीची टक्केवारी
पिंपरी-चिंचवड (वाकड) 6575/7795 19 टक्के
दिल्ली (सेक्टर 150, (नोएडा) 5100/6835 22 टक्के
कलकत्ता (ईएम बायपास) 6800/7710 13 टक्के
हैद्राबाद (मियापूर) 4250/5420 28 टक्के
चेन्नई (पेरुम्बकम) 4390/5240 19 टक्के
बेंगळुरु (सर्जापूर रोड) 5870/7425 26 टक्के