सातारा -येथील मंगळवार पेठेतील राजश्री रमेश जोशी यांनी धनादेशाद्वारे भरलेली 19 हजार 500 रुपयांची घरपट्टी बॅंकेत भरणा करताना परस्पर दुसऱ्याच खात्यावर जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित खातेदाराने आपल्या खात्याचे स्टेटमेंट काढल्यानंतर या सावळ्या गोंधळाचा खुलासा झाला. मात्र, या प्रकाराने पालिकेच्या लेखा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की नंदकुमार विनायक फडके यांच्यावतीने रजनी राजेंद्र जोशी यांनी दि. 30 मार्च 2022 रोजी घरपट्टीची 19 हजार 574 रुपये रक्कम धनादेशाद्वारे सातारा नगरपालिकेच्या सीएफसी सेंटरमध्ये जमा केली होती. काही दिवसांनी जोशी यांनी बॅंक स्टेटमेंटद्वारे संबंधित रक्कम आपल्या खात्यावरून वर्ग झाली काय याची खातरजमा केली असता त्यांच्या खात्यावरच्या रकमेचा चेक पटेल नावाच्या एका महिलेच्या नावाने वटविला गेल्याचे समोर आले.
त्यामुळे या सावळ्या गोंधळाचा त्यांनी संबंधित लेखा विभागात जाऊन कॅशियरकडे विचारणा केली असता कॅशियरने “तुम्हाला पावती मिळाली ना, पुढचा विषय आमचा आहे, आमचे आम्ही बघून घेऊ,’ असे सरकारी छापाचे उत्तर दिले. संबंधित महिलेने या प्रकाराची कल्पना त्यांच्या भागाच्या नगरसेविका भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार यांना दिली. सिद्धी पवार यांनीसुद्धा या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या सावळागोंधळचा उलगडा योग्य पद्धतीने झाला नाही.
कायदेशीर दाद मागण्याची तयारी
नगरपालिकेच्या दैनंदिन उलाढालीचे खाते बॅंक ऑफ बडोदा शाखेमध्ये आहे. लेखा विभागामध्ये रोजच्या जमा होणाऱ्या धनादेशाच्या रकमांचा संपूर्ण तपशील रोजच्या रोज त्या रकमेचे ताळेबंद आणि त्याचे सुसूत्रीकरण संबंधित यंत्रणेद्वारे केले जाते. कोणत्या रकमेचे किती धनादेश चेक जमा झाले याचेही डिटेल्स ई- मेलद्वारे संबंधित नगरपालिकेला पाठवले जातात. मग संबंधित घरपट्टीधारकाने त्याची घरपट्टी मुख्याधिकाऱ्यांच्या नावे धनादेशाद्वारे जमा केले असताना ही रक्कम पटेल नावाच्या महिलेच्या खात्यात कशी जमा झाली, या सावळ्या गोंधळाचे उत्तर ना लेखा विभागाने दिले ना संबंधित बॅंकेने.
सातारा पालिका दररोज कोट्यवधी रुपयांच्या रकमांचे हस्तांतरण करत असते. एकाचे बिल दुसऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा धक्कादायक प्रकार होत असेल तर या व्यवहाराला नियंत्रण करणारा लेखा विभाग प्रत्यक्षात तिथे काय काम करतो, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून दाद न मिळाल्यास कायदेशीर दाद मागण्याची तयारी संबंधित महिलेने चालवली आहे
================
===================