रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यात लॉकडाऊन काळात मे महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात आता घर, जमिनी खरेदीचे व्यवहारातून सहा महिन्यांत जवळपास 43 कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. राज्य शासनाने दस्त नोंदणी “फी’मध्ये कपात केल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यवहार झाले आहेत. सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी विक्रीचे व्यवहारासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणार आहे.
खेड तालुक्यात राजगुरूनगर येथे दोन तर चाकण येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताचे व्यवहार करण्यासाठी कार्यालये गर्दीने फुलुन गेली आहेत. ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर घरे, फ्लॅट, जमीन व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सध्या ही तीनही कार्यालये रात्री आठ वाजेपर्यंत सुरू आहेत.
मे ते ऑक्टोबरअखेर पर्यंत तालुक्यातील तीनही कार्यालयांमध्ये 7 हजार 329 एकूण झालेल्या विविध खरेदीपोटी 37 कोटी 10 लाख 90 हजार 603 रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले. नोंदणी फीचे 5 कोटी 41 लाख 74 हजार 515 रुपये मिळून एकूण 42 कोटी 52 लाख 65 हजार 18 रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहे, अशी माहिती राजगुरूनगर तहसील कार्यालय परिसरातील सहायक दुय्यम निबंधक संजय कातोरे, खेड बाजार समिती आवारातील सहायक दुय्यम निबंधक रोहिणी तागंडे तर चाकण येथील ए.आर.कणसे यांनी दिली.
- एजंटांचा कार्यालयांभोवती गराडा
सध्या चाकण औद्योगिक टप्यातील पाचव्या टप्यातील भूसंपादनातून कोट्यवधी रुपयांचा मोबदला वाटप सुरू आहेत तर भामा आसखेड धरणग्रस्तांना आता पुर्नवसनाच्या जमिनीऐवजी मोबदल्याचे पॅकेज म्हणून रक्कम वाटपास सुरू केली आहे. चाकण परिसरात कोट्यवधींच्या उड्डाणामुळे महागड्या गाड्याबरोबरच खरेदीखतांचे व्यवहार धुमधडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जमिनी पहाण्यासाठी गाड्यांचा ग्रामीण भागात धुराळा उडू लागला आहे. निराशेत गेल्याने सुस्तावलेल्या एजंट मंडळीचा आता कार्यालयाभोवती गराडा पडू लागला आहे. - शहरात 4 तर ग्रामीणमध्ये 3 टक्के मुंद्राक शुल्क
खेड तालुक्यातील खरेदी विक्रीचे व्यवहारांना गती येऊ लागल्याने राज्याच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडू लागली आहे. सर्वसाधारण विचार करता जमिनीच्या आणि घरांच्या व्यवहारात शहरी शेकडा 4 टक्के तर ग्रामीणला 3 टक्के मुंद्राक शुल्कापोटी आकारले जातात. या कपातीमुळे तालुक्यात करोडो रुपयांच्या उलाढाली झाल्या आहेत. - मे ते ऑक्टोबर या कालावधीत जमा महसूल (रुपयांत)
दुय्यम निबंधक…दस्त….मुद्रांक शुल्क…नोंदणी फी…एकूण
तहसील कार्यालय…1888…10 कोटी 91 लाख 40 हजार 950… 1 कोटी 64 लाख 375…12 कोटी 55 लाख 41 हजार 325
खेड बाजार समिती…2162… 8 कोटी 49 लाख 28 हजार 135… 1 कोटी 46 लाख 26 हजार 340… 9 कोटी 95 लाख 54 हजार 475
चाकण… 3279…7 कोटी 70 लाख 21 हजार 518… 2 कोटी 31 लाख 47 हजार 800… 20 कोटी 1 लाख 69 हजार 18