पुणे धक्का का दिला विचारल्याने चाकु पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.
सनी संजय कांबळे (वय 19, रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. भालचंद्र पवार, ऍड. अक्षय रतनगिरी, ऍड. योगेश पवार आणि ऍड. स्वपील गांगुर्डे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा जखमी झाल्याबाबत 17 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि जखमी गप्पा मारत उभारले होते. त्यावेळी एका 18 वर्षीय मुलाने जखमीला धक्का दिला. त्यावेळी जखमीने धक्का का दिला, अशी विचारणा केली.
त्यावेळी त्या मुलाने चाकु खुपसून जखमीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मुलाचा मित्र असलेले सनी आणि गोविंदसिंग टाक यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सनी याने जामिनासाठी अर्ज केला. ऍड. भालचंद्र पवार यांच्या युक्तीवादानंतर तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजर राहणे आणि इतर अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला.