पालिकेकडून यंत्रणा उभारण्याचे निर्देश : लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार
पिंपरी – नवीन शासनानाच्या नियमाप्रमाणे शंभर किलोच्या पुढे कचरा असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:चे घनकचरा व्यवस्थापन करावे लागणार आहे. अन्यथा महापालिका प्रशासनाकडून नोटीस दिली जाणार असून दंड वसूल केला जाणार आहे. यास हॉटेल व्यावसायिकांनी मात्र विरोध दर्शविला आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून हॉटेल व्यावसायिकांना स्वखर्चाने यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. जागे अभावी हॉटेल व्यावसायिकांना स्वत:चे घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य नाही ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गुरुवारी पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍन्ड रेस्टॉरंट असोसिएशन यांच्या वतीने कासारवाडी येथे बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कुलकर्णी आणि पद्मनाभ शेट्टी, गोविंद पानसरे, गणेश कुदळे, महेश हेगडे, सतीश तेलंग, हरीष शेट्टी व अन्य हॉटेल व्यावसायिक या बैठकीला उपस्थित होते.
आम्ही कर भरतो
यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की, कचरा व्यवस्थापन हे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य असून त्याकरिता व्यावसायिक मालमत्ता करासोबत कचरा व्यवस्थापनचा करही भरतात. प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या पर्यायांना व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आणि आरोग्य विभागाने हे काम करावे, अशी मागणी केली. परंतु मनपा प्रशासनाने हे अशक्य असल्याचे सांगत स्वहा कंपनीला काम द्या, असे सुचविले. याबाबत आमदार, खासदार आणि मंत्री यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला आहे.
महापौर व उपमहापौर यांनी आपल्या भाषणात संघटनेला त्यांच्या सर्व अडचणींमध्ये आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद पानसरे यांनी तर, आभार गणेश कुदळे यांनी केले.
“स्वहा रिसोर्स’ला काम द्या
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी इतर शहरातील हॉटेलमधील कचरा व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:चे वेस्ट कंपोस्ट मॅनेजमेंट यंत्रणा उभी करावी. तसेच शहराबाहेरील पिगरी व्यवस्थापक देण्याबाबत सूचना केली व त्याचा खर्च हॉटेल व्यावसायिकांनी भरावे असे सांगितले. स्वहा रिसोर्स मॅनेजमेंट या संस्थेला कचरा व्यवस्थापनाचे काम द्यावे, असेही यावेळी अधिकाऱ्यांनी सूचित केले. यावेळी स्वहा या कंपनीने व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले.