नगर, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या कचरा संकलन करणार्या ठेकेदाराचे गेल्या चार महिन्यांपासून बील थकीत आहे. बिल न दिल्यास दहा मार्चला ठेकेदाराने काम बंद करण्याचा इशारा दिला होता. परंतु शहरातील ठप्प झालेले कचरा संकलनाचे काम अखेर सुरळीत झाले. आठ दिवसात थकीत बील देण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहे. दरम्यान, थकबाकीवर तोडगा निघाल्यानंतरच ठेकेदारांनी कचरा काढला.
ठेकेदार संस्थेने कचरा संकलनाच्या कामास रविवारी दुपारनंतर सुरूवात केली. शहरातील दैनंदिन कचरा श्रीजी या खासगी ठेकेदार संस्थेमार्फत उचलला जातो. परंतु महापालिकेने संबंधित ठेकेदार संस्थेला गेल्या तीन- चार महिन्याचे पाच कोटी रुपयांचे बील दिले नाही. बील थकल्याने 10 मार्चपासून कचरा संकलनाचे काम बंद करण्याचा इशारा ठेकेदार संस्थेने दिला होता.
त्यानुसार रविवारी सकाळी हे काम बंद ठेवण्यात आले. आयुक्त डॉ. जावळे यांनी ठेकेदार संस्थेशी संपर्क करत येत्या आठ दिवसात थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर काम पुन्हा सुरळीत झाले.
कचरा संकलनाचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. शहर आणि उपनगरात दररोज सुमारे 140 टन कचरा जमा होतो. हा कचरा दररोज उचलून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्याचे काम ठेकेदार संस्था करते. त्यासाठी महापालिका ठेकेदार संस्थेला दरमहा पैसे देते. परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून हे बील न मिळाल्याने काम बंद करण्याचा निर्णय ठेकेदार संस्थेने घेतला होता. आयुक्तांच्या मध्यस्तीनंतर हा प्रश्न तात्पुरता सुटला आहे.
वसुली ठप्प असल्याने मनपाकडेही पैसे नाहीत.
कचरा संकलन करणार्या ठेकेदार संस्थेचे तीन महिन्याचे सुमारे पाच कोटी रूपयांचे बील थकीत आहे. त्याचबरोबर पाणी योजनेवरील सात कोटी रुपयांचे वीजबिल देखील थकले आहे. ही थकीत बिले देण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. हे बील 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून दिले जाते.
परंतु, महापालिकेला अद्याप पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यात ठेकेदाराचे बील बुजविण्यासाठी मनपाकडे स्वनिधी देखील नाही.आयुक्त डॉ. जावळे हे त्यातून कसा मार्ग काढतात? याकडे ठेकेदार संस्था आणि महावितरणच्या अधिकार्यांचे लक्ष लागले आहे.
दररोज थकबाकीदारांवर कारवाया सुरू आहेत. पाणी योजना, महावितरण बील, मुळा धरणातील पाण्याची पट्टी, कचरा संकलनची बिले देण्यासाठी वसुली वाढवून पैसे उपलब्ध करण्यात येत आहेत. सुविधा चालू राहतील, या दृष्टीने महापालिका प्रयत्न करत आहे. -डॉ. पंकज जावळे, प्रशासक, मनपा