हिमांशू
“हनिमून’ हा शब्द उच्चारला तरी एक गोड संवेदना तळपायापासून मस्तकापर्यंत विजेसारखी धावते. या अनुभूतीला वयाची (कमाल), शिक्षणाची, आर्थिक स्थितीची, सामाजिक स्थानाची अट नाही. हनिमूनची रंगीत स्वप्नं लग्नापूर्वीच सगळ्यांनी रंगवलेली असतात. आपापल्या कुवतीनुसार हे सोनेरी क्षण साजरे करण्यासाठी नवपरिणित जोडपी घराबाहेर पडतात. सगळ्या चिंता, तणाव दूर ठेवून त्या संमोहित करणाऱ्या अनुभवात गढून जातात. त्या क्षणांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनःपटलावर
कायमच्या कोरल्या जातात. नव्या जोडप्यांप्रमाणेच जोडीनं सत्तेत आलेल्या नव्या सरकारचाही “हनिमून पीरिअड’ असतो, असं म्हटलं जातं. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसंदर्भात हा शब्द वापरला जात नाही; मग राजकारणातच तो कुठून कसा शिरला हे कोडंच आहे! परंतु काहीही म्हणा… “हनिमून’ नावानं ओळखले जाणारे नव्याचे नऊ दिवस सर्वांना सुखावणारे असतात आणि ते संस्मरणीय करण्याकडे सर्वांचा कल असतो. “मधुचंद्र’ असं या शब्दाचं मराठी भाषांतर केलं जातं. या नव्या-नव्या दिवसांचा चंद्राशी नेमका काय संबंध आणि सर्वप्रथम तो कुणी जोडला, हे हनिमूनला जाणारे नेमकेपणानं सांगू शकणार नाहीत. कदाचित, या शब्दाचा आविष्कार करणाऱ्याला एकमेकांच्या साथीनं आयुष्यात झिरपणारं चांदणं अपेक्षित असावं. प्रेयसीला चंद्र-तारे आणून देण्याचं आश्वासनही प्रियकर बहुतेक याच प्रतीकात्मक शब्दाच्या जोरावर देत असावा आणि प्रेयसीलाही तेच अभिप्रेत असावं. कारण या मुद्द्यावरून ब्रेक-अप झाल्याचं ऐकिवात नाही.
आता मात्र एकदा ब्रेक-अप झालेला प्रियकर खऱ्याखुऱ्या चंद्राचं स्वप्न दाखवून दुसरी प्रेयसी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या महाशयांना हनिमूनसाठी थेट चंद्रावरच जायचंय आणि “मेरी बनेगी कोई हिंमतवाली’ या चालीवर त्यांनी चक्क पेपरात जाहिरात दिलीय. “प्रेयसी पाहिजे’ हा जाहिरातीचा मथळा आपल्याकडे खूपच धक्कादायक ठरेल; पण जाहिरात देणारे महाशय जपानमधले आहेत; शिवाय अब्जाधीश आहेत. श्रीमंत लोक पूर्वी समाजात नव्हते असं नाही; पण हल्ली अब्जाधीशांचं विश्व इतकं वेगळं असतं, किंबहुना ते इतक्या वेगळ्या विश्वात वावरत असतात, जणू ते या धरतीवरचे नाहीतच! मग हनिमून तरी ते या धरतीवर कसा साजरा करतील? “युसाका मैजवा’ हे जाहिरात देणाऱ्या गृहस्थाचं नाव. हो, गृहस्थच! कारण ते 44 वर्षांचे आहेत. शिवाय, त्यांचं हे दुसरं लग्न असणार आहे. “लग्न’ हा शब्द तरी कसा वापरावा? कारण जाहिरातचा मथळा आहे “प्रेयसी पाहिजे’! अर्थात, पुढील मजकुरात “जीवनसाथी’ असाही शब्द वापरलाय. ऍलन मस्क यांच्या खासगी एजन्सीमार्फत “स्पेस-एक्स’ या रॉकेटमधून ते चंद्रावर जाणार आहेत. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर जाणारे पहिले अंतराळवीर असले, तरी “पर्यटक’ म्हणून चंद्रावर चाललेले युसाका हे पहिलेच मानव आहेत.
अर्थातच, पहिल्या गर्लफ्रेंडशी ब्रेक-अप झाल्यानंतर हे “पर्यटन’ संस्मरणीय ठरायचं असेल, तर सोबतीला दुसरी गर्लफ्रेंड हवीच, असा त्यांचा आग्रह आहे. चंद्रावर जाण्याची तयारी असणारी ही गर्लफ्रेंड 20 वर्षांची असावी, आपल्याला एकटेपणा वाटू लागला असून, जीवनात स्त्री असणं आवश्यक असल्याचं त्यांनी जाहिरातीत म्हटलंय. चंद्रावर जाताना त्यांना अपेक्षित सोबत मिळते का, हे आज ठरेल; कारण “अर्ज’ करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.