आळंदी -पीएमपीएमपीएल वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये पडलेले नऊ हजार रुपये महिलेलो परत मिळाले आहेत. स्वारगेट-आळंदी या 29 क्रमांकाच्या बसमध्ये शनिवारी सकाळी एका महिला प्रवाशाचे नऊ हजार रुपये सीटवर पडले होते. सर्व प्रवासी बसमधून उतरून गेल्यानंतर वाहक तुकाराम मदने (बॅच नंबर 5230) यांनी ही रक्कम असलेला बटवा सीटवर पाहिला व लागलीच आळंदी बसस्थानकाचे स्थानक प्रमुख सिकंदर मुलाणी यांच्याकडे स्वाधीन केला.
त्यात नऊ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यामध्ये महिला मथुबाई साबळे यांचा मोबाईल नंबर मिळाला. महिलेस फोन केला असता ताबडतोब त्यांनी बसस्थानकात येऊन संपर्क केला. खात्री केली असता तो बटवा मोबाईल नंबर हा मथुबाई साबळे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने ही रक्कम त्यांना प्रामाणिकपणे परत केली.
यावेळी आळंदी बस स्थानक प्रमुख सिकंदर मुलाणी, एकनाथ कोप्तरे, विजय काळजे, दिनकर काळजे, राजाराम काळजे, सुभाष कांबळे, महादेव पाखरे, भगवान लेंडघर, राजेश्वर पंपटवार आदींनी तुकाराम मदने या प्रामाणिक वाहकाचे अभिनंदन केले.