132 किलोमीटर मार्गावर 14 बोगदे, 17 उड्डाणपूल, 37 अंडरबायपास
एमएसआरडीसीकडून होणार दोन टप्यांत काम
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडसाठी सुमारे 1200 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. एमएसआरडीसीच्या रिंगरोडचे पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे दोन टप्पे केले आहे. या रिंगरोडची एकूण लांबी 132 किलोमीटर असून 14 बोगदे, 17 उड्डाणपूल, 37 अंडरबायपास असणार आहेत.
एमएसआरडीसीच्या रिंगरोडला राज्य सरकारकडून यापूर्वीच मान्यता देण्यात आली असून त्याला “राज्य महामार्गाचा दर्जा’ मिळाला आहे. या मार्गाचे “सर्वंकष प्रकल्प अहवाल’ तयार करण्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीच्या या प्रस्तावित रिंगरोडची एकूण लांबी सुमारे 132 किलोमीटर असून 90 मीटर रुंदीचा सहापदरी रस्ता आहे. खेड शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी 1200 हेक्टर जागेची आवश्यकता असून भूसंपादनासाठी जळपास 3 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
थेट खरेदी पद्धतीने जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून दोन टप्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व भागाकडील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे.
पूर्व भागाच्या रिंगरोडची वैशिष्टे
– एकूण सात बोगदे असणार
– दोन रेल्वे उड्डाणपूल
– चार उड्डाणपूल
– सात अंडरबायपास
– एकूण भूसंपादन -594 हेक्टर
– पश्चिम भागातील रिंगरोडची वैशिष्टे
– एकूण सात बोगदे असणार आहेत
– 13 छोटे आणि मोठे पूल
– 30 अंडरबायपास
– भूसंपादन 617 हेक्टर