पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून परदेशातून आलेल्या सुमारे 1,912 जणांना “होम क्वॉरंटाइन’ केले आहे. हे नागरिक बाहेर पडल्यास करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्याने या सर्वांवर पोलिसांची नजर आहे. मात्र, त्यासोबतच आता या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी एका खासगी कंपनीच्या मदतीने महापालिकेने सॉफ्टवेअर विकसित केले असून येत्या 2 दिवसांत ते महापालिकेस मिळणार आहे. त्यात मोबाइलच्या जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला आहे.
शहरात करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉ. नायडू रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवले असून रुग्णांवर उपचारही सुरू आहेत. याशिवाय, अनेकांना होम क्वॉरंटाइन केले आहे. या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने कॉलसेंटर सुरू केले असून दिवसातून तीनवेळा त्यांना फोन केला जातो. तर पोलीसही दररोज त्यांच्या घरी फेरी मारतात.
पालिका आणि पोलिसांकडून त्यांना सतत फोन, व्हिडीओ कॉल्स आणि प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली जात आहे. हे काम अधिक सोपे होण्याकरिता पालिकेला एक खासगी कंपनी “सीएसआर’मधून सॉफ्टवेअरची निर्मिती करून देणार आहे. या ऍपद्वारे संशयीत घरी सोडलेले रुग्ण यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या दैनंदिन हालचाली, दैनंदिन आरोग्य आणि सुधारणा याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.