नवी दिल्ली – राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाने त्यांचे नागरीकत्व स्पष्ट करण्याविषयी लोकसभा निवडणूक काळात नोटीस जारी केली आहे. तथापी त्या नोटीशीचा तपशील सादर करण्यास गृहमंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारात मंत्रालयाकडे ही माहिती मागवण्यात आली होती. पण हा तपशील दिल्यास त्याचा तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे कारण देऊन मंत्रालयाने हा तपशील देण्यास नकार दिला.
भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या तक्रारीवरून गेल्या एप्रिल महिन्यात गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस जारी करून आपल्या नागरीकत्वाची नेमकी माहिती सादर करा अशी त्यांना सुचना केली आहे. त्यावर एका याचिकाकर्त्याने गृहमंत्रालयाकडे एक अर्ज करून गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना बजावलेल्या नोटीशीची कॉपी आणि त्यावर राहुूल गांधी यांच्याकडून आलेले उत्तर याचा तपशील मागवला होता.
कोणाच्याही व्यक्तीगत माहितीचा सार्वजनिक हिताशी संबंध नाही अशी माहिती देणे एखाद्याच्या प्रायव्हसीवरील अतिक्रमण ठरू शकते तसेच त्या विषयीच्या तपास कामातही त्यातून अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून ही माहिती देता येणार नाही असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.