Breaking News : गृहमंत्रीपद पुणे जिल्ह्यात; दिलीप वळसे-पाटलांच्या नावावरच शिक्कामोर्तब

पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर गृहमंत्रीपद आता पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. राष्ट्रवादीतील “क्‍लीन इमेज’ असलेले आणि शरद पवार यांचे सर्वांत विश्‍वासू, कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. आधीच वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे-पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाचा राहिल, असे बोलले जात होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना वळसे-पाटलांना गृहमंत्रिपदाबाबात विचारणा झाली होती; मात्र प्रकृतीमुळे त्यांनी त्यावेळी पद घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे आता त्यांना हे पद दिल्यास ते स्वीकारणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.