मी पॉवर हिटर नाही – चेतेश्‍वर पुजारा

रोहित-विराटला पाहून फटकेबाजीसाठी सज्ज

चेन्नई – भारताचा “कसोटी स्पेशलिस्ट’ चेतेश्‍वर पुजाराला त्याच्या संयमी खेळीसाठी ओळखले जाते. त्यामुळे क्रिकेटच्या सर्वात जलद स्वरूपात अर्थात टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची त्याला जास्त संधी मिळत नाही. जगप्रसिद्ध टी20 लीग इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो जास्त खेळताना दिसत नाही. परंतु यंदा चेन्नई सुपर किंग्जसारखा बलाढ्य खरेदीदार मिळाल्याने पुजाराचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. आगामी हंगामात आपल्यातील फलंदाजीची धमक दाखवण्यासाठी तो आतुर असल्याचे त्याने सांगितले आहे.

आयपीएलच्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्जने चेतेश्‍वर पुजाराला तब्बल 50 लाख रुपये देवून खरेदी केले आहे. एका मुलाखतीत त्याला स्ट्राइक रनरेटबाबत विचारले असता पुजारा म्हणाला की, मी या गोष्टीशी सहमत आहे की माझा स्ट्राईक रेट चांगला नाही. मी एक चांगला पॉवर हिटर नाही. पण मी विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. मला माझ्या फलंदाजीत जास्त सुधारणा करण्याची आवश्‍यकता नाही. रोहित-विराटसारखे फलंदाज योग्य वेळ पाहून चेंडूला हिट करत असतात. मर्यादित षटकांच्या स्वरूपात खेळताना मी त्यांचे बारीक निरीक्षण केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंवर खूप दबाव असतो. तुमच्या विकेटसाठी किंमत असते. परंतु टी-20मध्ये आपल्याला स्वतःला व्यक्‍त करण्याची आणि शॉट्‌स खेळण्याची संधी मिळत असते. तुम्ही केन विलियम्सन, स्टिव्ह स्मिथ यांसारख्या फलंदाजांना पाहून या गोष्टी शिकू शकता. हे सर्व फलंदाज केवळ चांगले शॉट खेळत धावा बनवत असतात आणि सोबतच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात.

मी देखील हीच मानसिकता ठेवली आहे. जर मला आयपीएलमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मला काही-ना-काही नवीन करावे लागणार आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी ताकतीची गरज असते. पण क्रिकेटची पूर्ण जाण असल्यास या गोष्टीही सहज साध्य होतात, असे पुजारा म्हणाला. मी पूर्वी टी-20 फॉर्मेटमध्ये खेळत होतो. तेव्हा मला माझा खेळ बिघडण्याची भिती वाटत होती. पण आता मी आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झालो असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, या हंगामातील चेन्नईचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी गतवर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.