राठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई – काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी 100 कोटीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जाणार असल्याने गृहमंत्रीपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत राजीनामा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,” अशी स्फोटक प्रतिक्रिया औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या यांनी परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. सोमय्या यांच्या आजच्या स्फोटक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.