पुणे – अमली पदार्थ तस्करी प्रकरणात राजकीय नेते आणि बडे अधिकारी ललित पाटीलला पाठीशी घालत आहेत. या प्रकरणाची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली.
पक्षाच्या वतीने बुधवारी ससून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कणव चव्हाण, किशोर कांबळे, विक्रम जाधव, शेखर धावडे, मीना पवार, आसिफ शेख, मनाली भिलारे, गणेस नलावडे, रोहन पायगुडे, नरेश पगाडालू, शिल्पा भोसले यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ललित पाटील हा राज्यात ड्रग्जचे जाळे पसरवत होता. तोपर्यंत कायदा व सुव्यवस्था कोठे होती?, ललित पाटील अटकेत असताना त्याला ससून रुग्णालयात, पंचातारांकित हॉटेलमध्ये सेवा कोण पुरवत होते? याची चौकशी करावी, सरकारमधील कोणते मंत्री, अधिकारी ललित पाटीलचे एजंट म्हणून काम करत आहेत, हे जनतेसमोर आणावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.