भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या विजयादशमी दिवशी अनेक महत्त्वाच्या विषयांचे संकल्प केले जातात. नवनवीन उपक्रम सुरू केले जातात. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मात्र विजयादशमीचा मुहूर्त फक्त वक्तृत्व शैली दाखवण्यासाठीच वापरला गेला की काय, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही. शारदीय नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा घेतला, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने पारंपरिक पद्धतीने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला. भारतीय जनता पक्षाच्याच एक नेत्या आणि सध्या थोड्या बाजूला पडलेल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या बीड गावामध्ये नेहमीचा एक मेळावा घेऊन असंतोषाचा सूर लावून वेगळ्या प्रकारे आपल्या विचारांना वाट व्यक्त करून दिली. हे सर्व सुरू असतानाच मराठा आरक्षणासाठी लढणारे मोहन जरांगे पाटील यांनीसुद्धा आपल्या या विषयासाठी नव्या आंदोलनाची घोषणा केली. म्हणजेच या विजयादशमीला सर्व स्तरातील राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक नेत्यांनी आपली वक्तृत्वशैली तपासून घेतली. अर्थात, यापैकी सर्वात जास्त लक्षणीय आणि आकर्षणाचे केंद्र ठरले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आझाद मैदानावरील मेळावा आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचा शिवाजी पार्कवरील मेळावा. एकनाथ शिंदे यांनी सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेतून हे भाषण केले; पण हे भाषण करत असताना त्यांनीही ठाकरे भाषेचा वापर करूनच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नेहमीप्रमाणे गद्दार, मिंधे, दिल्लीपुढे झुकणारे, महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे प्रयत्न हेच विषय हाताळून एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या सरकारवर टीका केली. पंकजा मुंडे यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षावर आणि सरकारवर टीका करत असताना आता लोकांमधील निराशेचे वातावरण वाढत चालले आहे आणि मी पुन्हा एकदा नव्या जोमाने राजकारणात उतरणार आहे, अशी घोषणा केली. या घडामोडी घडत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मात्र पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देऊन आपण या आंदोलनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. विजयादशमी दिवशी घडलेल्या या सर्व घडामोडींवर नजर टाकली तर केवळ राजकीय कुरघोडी करण्यासाठी आणि शक्तिप्रदर्शन करण्यासाठीच अशा प्रकारे जर मेळावे घेण्यात येत असतील, तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा काय याचाही विचार करायची गरज आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर झालेल्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांसमोर शपथ घेऊन मराठा आरक्षण देणारच अशी घोषणा केली असली, तरी मुळात या विषयासाठी जी मुदत दिली होती त्या मुदतीत या सरकारने काहीच केले नाही ही बाबही नाकारून चालणार नाही. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्याच पद्धतीने नेहमीचेच विषय नेहमीच्याच शैलीमध्ये हाताळून निवडणुकीनंतर देशातून मोदी सरकारला जावेच लागेल अशी एक घोषणा केली. हे नेते जेव्हा व्यासपीठावर बोलत असतात तेव्हा उपस्थित असलेले हजारो लोक आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या निमित्ताने पाहणारे लाखो लोक त्यांचे विचार ऐकत असतात. साहजिकच भाषणबाजीचे राजकारण करणाऱ्या अशा नेत्यांनी कटुता निर्माण होईल अशा प्रकारची विधाने करणे टाळले पाहिजे. परंतु केवळ एकमेकांना दुखावण्याच्या हेतूनेच आणि एकमेकांवर कुरघोडी करून उत्तराला प्रत्युत्तर देण्याच्या निमित्तानेच अशा प्रकारचे मेळावे घेतले जातात. महाविकास आघाडीचा प्रयोग होणार होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या काही माणसांना शरद पवारांकडे पाठवून उद्धव ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले जावे अशी विनंती केली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. हीच त्यातल्या त्यात फक्त नवी गोष्ट. अर्थात, एकनाथ शिंदे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत तेच ते आणि तेच ते विषय चघळून त्यांनी फक्त टाळ्या मिळवण्याचे काम केले. असाच प्रकार काही प्रमाणात पंकजा मुंडे यांनीसुद्धा केला. आपल्याला पक्षामध्ये डावलले जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून त्यांनी मी लवकरच सक्रिय होणार असून मी ज्यांचे प्रतिनिधित्व करते त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. राजकारण हा 24 तासांचा व्याप असताना पंकजा मुंडे गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टी काढून बाजूला गेल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुट्टी संपल्यावर त्यांनी सक्रिय होण्याची घोषणा केली असली, तरी पक्षीय पातळीवर त्यांच्या या घडामोडींची नोंद कितपत घेतली जाते हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. साहजिकच नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना अनेक नेत्यांनी व्यासपीठावर आपली वक्तृत्वशैली दाखवून दिली असली तरी त्याचे पडसाद येत्या काही दिवसांमध्ये उमटणे परिहार्य आहे. या व्यासपीठावर हजारो लोकांच्या साक्षीने त्यांनी जी विधाने केली आहेत त्या विधानांप्रमाणे कृती करणेसुद्धा या सर्व नेत्यांना बांधील राहणार आहे, हे निश्चित. सामान्य नागरिक मात्र या नेत्यांचे भाषण चांगलं झालं का त्या नेत्याचे भाषण चांगलं झालं, अशी चर्चा करत करत नंतर मात्र उद्याचा दिवस कसा ढकलायचा याचाच विचार करत जगत राहणार आहे. या नेत्यांच्या वक्तृत्वाने आपल्याला काय मिळाले, या प्रश्नाचा शोध घेत राहणार आहे.