Entertainment । अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच तिच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर तिचा अपघात झाला. यामध्ये प्रियांकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या चेहऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ओरखडे स्पष्टपणे दिसत आहेत. तिच्या चेहऱ्याकडे पाहून असे दिसते की, स्टंट करताना प्रियांकाला चांगलाच फटका बसला होता.
प्रियंका चोप्रा जोनासने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या चेहऱ्याचा फोटो शेअर करून जखम दाखवली. फोटोत, चेहरा आणि कपाळाच्या उजव्या बाजूला रक्ताचे ठिपके दिसत आहे. ‘हेड ऑफ स्टेट’मध्ये प्रियांका धोकादायक ॲक्शन सीन आणि स्टंट करताना दिसणार आहे. या चित्रपटात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्याही भूमिका आहेत.
फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले आहे की, ‘मागील काही वर्षांत मी जखमांचे किती फोटो पोस्ट केले असतील हे मला माहीत नाही.’ प्रियांकाचा हा फोटो व्हायरल होत आहे. हेड ऑफ स्टेट हा कॉमेडी-ॲक्शन चित्रपट असल्याने प्रियांकाला स्टंट करताना या दुखापती झाल्या असण्याची शक्यता आहे.
सध्या प्रियांका या चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्समध्ये आहे, तिथून ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. शूटिंगमधून वेळ काढून प्रियंका तिची मुलगी मालतीसोबतवेळ घालवत आहे. तसेच खूप एन्जॉय करत आहे. याआधी प्रियांकाने शूटसाठी जाताना सकाळचा सेल्फी शेअर केला होता. यामध्ये तिला मेकअपशिवाय पाहून चाहते प्रभावित झाले आणि तिच्या साध्या स्टाईलचे कौतुक करू लागले.