कर्जमाफी योजनेच्या परिपत्रकाची होळी

राहुरी  – राज्य शासनाच्या ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या परिपत्रकाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज येथे होळी करण्यात आली. शासनाची ही योजना फसवणूक करणारी असून तिचा निषेध करण्यात आला. मागणीप्रमाणे या कर्जमाफीच्या परिपत्रकात बदल न केल्यास राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर आज हे निषेधाचे आंदोलन करण्यात आले. संघटनेने जिल्हाध्यक्ष रवी मोरे, सतीष पवार, बाळासाहेब जाधव, संदीप खुरुद आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
27 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे परीपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे.

याआधीच्या सरकारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारची ही कर्जमाफी योजना देखील फसवी आहे. विनाअट सरसकट कर्जमाफी दिली जाईल, सातबारा कोरा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केली होती.

या घोषणेप्रमाणेच त्याची अंमलबजावणी केली जावी. या परिपत्रकातून दोन लाखांची अट व थकीत शब्द वजा करून सरसकट कर्जमाफी दिली जावी व सातबारा कोरा केला जावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी आज येथे केली.

याबाबतच्या निवेदनावर संदीप खरूद, प्रमोद पवार, निलेश लांबे, सचिन पवार, सचिन पवळे, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्‍वर भिंगारदे, सतीश पवार, सुनील काचोळे आदींच्या सह्या आहेत. या परिपत्रकाची संघटनेच्या कार्यकर्त्यांनी होळी केली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.