शिक्रापूर (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील राजकारणातील महत्वाचे नेते असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना नुकतीच शिक्रापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर ) पोलीस स्टेशन येथे मागील आठवड्यात पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्यानंतर सदर प्रकरणात त्यांना न्यायालयाने तात्पुरता जमीन मंजूर केलेला असताना आज २६ मे रोजी कोणत्या तरी चौकशी साठी बांदल यांना शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये बोलाविण्यात आलेले होते. मात्र पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता शिक्रापूर पोलिसांनी अटक केली.
अटक केल्यानंतर तातडीने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मंगलदास बांदल यांना शिरूर पोलीस स्टेशन च्या कोठडीत रवाना केले असून अद्याप पर्यंत कोणत्या गुन्ह्यात मंगलदास बांदल यांना अटक केली याबाबत माहिती देण्यास शिक्रापूर पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे.