हॉकी एक्‍सलन्सी, विक्रम पिल्ले अकादमी ‘अ’ संघ उपांत्य फेरीत

मार ओस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धा

पुणे – विनीत कांबळे आणि वेंटकेश केंच यांच्या वैयक्ति कामगिरीच्या जोरावर अनुक्रमे एक्‍सलन्सी अकादमी आणि विक्रम पिल्ले अकादमी अ संघांनी येथे सुरू असलेल्या मार ओस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एक्‍सलन्सी अकादमी संघाने ग्रीन मेडोजचे 6-3, तर विक्रम पिल्ले अकादमी अ संघाने प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटरचे आव्हान 7-1 असे संपुष्टात आले.

अत्यंत कडक उन्हात झालेल्या या सामन्यात एक्‍सलन्सी अकादमीच्या विजयात विनीत कांबळे हिरो ठरला. त्याने 13, 25 आणि 29व्या मिनिटाला सलग तीन गोल करून संघाची जबरदस्त सुरवात केली. विनीतने दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. ग्रीन मेडोजच्या खेळाडूंनी जोरदार प्रतिआक्रमण करताना पूर्वार्धातच दोन गोल केले. संग्राम पोकळे याने 24 आणि 28व्या मिनिटाला गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली होती. मात्र, त्यांना विनीतला रोखण्यात अपयश आल्याने पूर्वार्धापूर्वी त्यांना आणखी एक गोल सहन करावा लागला.

मध्यंतराच्या 3-2 अशा निसटत्या आघाडीनंतर उत्तरार्धात हर्ष परमार (39वे), सौरभ पाटिल (47) आणि मोनिष चव्हाण (56वे मिनिट) यांनी एक्‍सलन्सीची आघाडी 6-2 अशी भक्कम केली. ग्रीन मेडोज संघाने सामन्यात गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण, त्याचे गोलात रुपांतर करण्यात अपयश आल्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या अमित राजपूतने 56व्या मिनिटाला गोल करून पिछाडी भरून काढली.

त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात विक्रम पिल्ले अकादमी अ संघाने देखील वेंकटेश केंचच्या तीन गोलमुळे आपले वर्चस्व राखले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला त्याने पहिला गोल केला. त्यानंतर 20व्या मिनिटाला मुजावर याने गोल करून आघाडी वाढवली. त्याचवेळी ब्रायन लुईसने प्रियदर्शिनीसाठी गोल करून संघाचे आव्हान राखले. उत्तरार्धात विक्रम पिल्ले अकादमीच्या खेळाडूंनी कमालीचा वेगवान खेळ करताना पाच गोल केले. वेंकटेशने 35 आणि 59व्या मिनिटाला गोल केले. आदित्य लांडगेने 36व्या, हरिष शिंदगीने 37 आणि तालेब शाह याने 46व्या मिनिटाला गोल करून संघाचा मोठा विजय निश्‍चित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.