नवी दिल्ली – भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असल्याचे आपण इतकी वर्षे समजत होतो मात्र, ही वस्तूस्थिती नाही. अद्याप या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यताच मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. आता मात्र, या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
गेली कित्येक वर्षे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असल्याचे मानले जात होते. पण अधिकृतरित्या या खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आलेले नसल्याने याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. हॉकीला राष्ट्रीय खेळ घोषित करा व तसे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत अशी मागणीही या याचीकेत करण्यात आली आहे.
हॉकीला देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याचे म्हटले जात असले तरीही आजही सरकारने हॉकीला अधिकृत राष्ट्रीय खेळ म्हटलेले नाही. हॉकी भारतातील एक महान खेळ असून सरकारकडून हवा कसा पाठिंबा या खेळाला मिळालेला नाही. तसेच केंद्र सरकारने ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना शाळा आणि महाविद्यालयात लोकप्रिय करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
कोणत्याही खेळाला राष्ट्रीय मान्यता नाही
भारताचा कोणताच राष्ट्रीय खेळ नसल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. याच वर्षी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने माहिती अधिकारात क्रीडा मंत्रालयाकडून मागितलेल्या माहितीनंतर भारत सरकारने सर्व खेळांना समान वागणूक देण्यासाठी कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित केला नसल्याचे समोर आले होते. त्यावरूनच आता ही मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.