दुबई – जागतिक क्रिकेटची सर्वोच्च संघटना असलेल्या आयसीसीला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाचे स्वप्न पडले आहे. त्यासाठी 2028 साली लॉस एंजेलीसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयसीसीने सांगितले आहे.
आयसीसीने एक समिती स्थापन केली असून ते येत्या काळात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना, अमेरिका ऑलिम्पिक संघटना तसेच लॉस एंजेलीस ऑलिम्पिक संघटना यांच्याशी सातत्यानवे चर्चा करण्यात येणार आहे.
या समितीवर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत 2028 सालापासून क्रिकेटचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ 2028 सालची स्पर्धा नव्हे तर, 2032 सालच्या स्पर्धेत तसेच त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धांमध्ये क्रिकेटचाही समावेश व्हावा यासाठी आयसीसी अत्यंत गंभीरपणे प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले गेले आहे.
अमेरिकेत करोडो क्रिकेट चाहते राहतात. ते भारतासह क्रिकेट खेळत असलेल्या अनेक देशांतून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहायचे असतात. त्यातच 2028 साली अमेरिकेतच ऑलिम्पिक स्पर्धा होत असून त्यात जर क्रिकेटचा समावेश झाला तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही आयसीसीने व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाची मागणी गेले अनेक वर्षे होत आहे. मात्र, त्याबाबत कधीही गांभार्याने चर्चा झाली नाही. अशी स्पर्धा जर ऑलिम्पिकमध्ये घेण्यात आली तर त्यात भारतीय संघ निश्चितच सहभागी होण्यास तयार असेल, असे सांगत बीसीसीआयनेही काही वर्षांपूर्वी आयसीसीला आश्वस्त केले होते.
128 वर्षांनी समावेशाचे प्रयत्न
ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा समावेश प्रथम 1900 साली झाला होता. त्यावेळी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटने प्रवेश केला होता. मात्र, ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्सने या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक पटकावले होते.