मार ओस्थाथिओस स्मृती निमंत्रित हॉकी स्पर्धा : ग्रीन मेडोज, रोव्हर्स अकादमीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पुणे -ग्रीन मेडोज आणि रोव्हर्स अकादमी संघाने येथे होत असलेल्या हॉकी महाराष्ट्राच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या मार ओस्थाथिओस स्मृती निंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत रोव्हर्स अकादमी संघाने पिछाडीवरून फ्रेंड्‌स युनियनचा 5-2, तर ग्रीन मेडोजने विक्रम पिल्ले अकादमी ब संघाचा 3-1 असा सहज पराभव केला. रोव्हस आणि फ्रेंडस युनियन सामन्यात एकूण सात गोल झाले. सामन्याची सुरवात सनसनाटी झाली. फ्रेंड्‌स संघाच्या योगेश पाठकने इनडायरेक्‍ट पेनल्टी कॉर्नरवर रोव्हर्सचा गोलरक्षक शिवाजी गायकवाडला चकवून संघाचे खाते उघडले.

यापूर्वीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारलेल्या रोव्हर्सने नंतर आपल्या खेळात सुधारणा करत जोरदार प्रतिआक्रमण केले. मध्यंतराच्या काही क्षण आधी रोव्हर्सच्या गुफान शेख याने फ्रेंडसच्या गोलरक्षक सागर मल्लेल याला खुबीने चकवले आणि सामन्यात बरोबरी साधली. उत्तरार्धात सुरवातीलाच आदित्य रसाळने गोल करून रोव्हर्सला आघाडीवर नेले. लगोलग पुढच्याच मिनिटाला राहुल रसाळने गोल करून संघाची आघाडी 3-1 अशी वाढवली.

त्यानंतर राहुलनेच कॉर्नरवर आणखी एक गोल करताना संघाची आघाडी 4-1 अशी भक्‍कम केली. सामन्याचा अखेरचा टप्पा वेगवान झाला. यात लागोपाठ दोन गोल झाले. पण, फ्रेंडसला केवळ पिछाडी भरून काढण्याचे समाधान मिळाले. सामन्याच्या 58व्या मिनिटाला रोहन डेडेने रोव्हर्ससाठी, तर 59व्या मिनिटाला संकेत हिरेने फ्रेंड्‌स साठी गोल केला. त्यापूर्वी झालेल्या सामन्यात ग्रीन मेडोजने विक्रम पिल्ले अकादमीच्या ब संघाचे आव्हान सहज मोडून काढले. रवी बाजवा याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून ग्रीन मेडोजचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या 22व्या मिनिटाला विकार कारंडे, 29व्या मिनिटाला रवी झोपे यांनी गोल करून मध्यंतरासच 3-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धातही विक्रम पिल्ले संघाचे खेळाडू ग्रीन मेडोजला आव्हान देऊ शकले नाहीत.

सविस्तर निकाल:

ग्रीन मेडोज 3 (रवी बाजवा 14वे मिनिट, विकास कारंडे 22वे मिनिटे, राहुल झोपे 29वे मिनिट) वि.वि. विक्रम पिल्ले अकादमी व 1 (निखिल भोसले 36वे मिनिट) मध्यंतर 3-0

रोर्व्हस अकादमी 5 (गुफान शेख 30वे मिनिट, आदित्य रसाळ 32वे मिनिट, राहुल रसाळ 34वे मिनिट, 40वे मिनिट, रोहन डेडे 57वे मिनिट) वि.वि. फ्रेंडस युनियन 2 (योगेश पाठक 18वे मिनिटे, संकेत हिरे 59वे मिनिट ) मध्यंतर 1-1.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.