लातूरमध्ये शिक्षकांना नेतागिरी भोवली

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 31 शिक्षकांवर गुन्हा दाखल
लातूर – नेतागिरी करणाऱ्या खाजगी शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिकामध्ये पानभर जाहीरात देत राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोटो वापरले. आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील 31 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदन धुमाळे हे लातूर येथील राजमाता जिजामाता विद्यालयात शिक्षक आहेत. ते राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्षही आहेत. त्यांचा 5 एप्रिल रोजी वाढदिवस असताना त्यांनी काही वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली होती. त्यांना शुभेच्छा म्हणून 30 शिक्षकांचे फोटो, नावे या जाहिरातीत देण्यात आले होते. हे सर्व शिक्षक खाजगी संस्थेत असले तरी त्यांना शासन पगार देते. शासकीय पगार घेणाऱ्या व्यक्तींना अशा पद्धतीने निवडणूक काळामध्ये जाहिरात देता येत नाही. विशेष करून राजकीय पक्षांचे फोटो वापरता येत नाहीत. असे असतानाही जाहिरातीमध्ये राजकीय नेत्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याने लोकसभा निवडणूक आचारसंहिता विभागाचे प्रमुख विपीन इटनकर यांनी या 31 शिक्षकांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. पण, त्यांचा खुलासा पुराव्यानिशी व समर्पक स्पष्टीकरण असलेला नव्हता. तो खुलासा अमान्य करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर या सर्वांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बंकवाड हे अधिक तपास करत आहेत. निवडणूक काळामध्ये खाजगी शिक्षकांवर एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या 31 शिक्षकांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.