#Hockey : पुरूष हाॅकी संघाचा जर्मनीवर विजय

करोना काळानंतर भारताची पहिलीच मालिका

बर्लिन – करोनाच्या धोक्‍यानंतर म्हणजे जवळपास 11 महिन्यांनंतर पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान जर्मनीचा 6-1 असा धुव्वा उडवत हॉकी मालिकेची थाटात सुरुवात केली.

 या सामन्यात भारताचा स्ट्राइकर निळकंठ शर्माने 13 व्या मिनिटाला पहिला गोल केला व दिमाखदार प्रारंभ केला. त्यानंतर विवेक सागर प्रसाद (27 व्या आणि 28 व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (41 व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (42 व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (47 व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले. भारताला 13 व्या मिनिटाला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळाला, त्यावर निळकंठने गोल केला. त्यानंतर एकाच मिनिटांनी कॉन्टन्टिन स्टेइबने जर्मनीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात विवेकने लागोपाठ दोन गोल करत भारताला 3-1 असे आघाडीवर आणले.

तिसऱ्या सत्रात जर्मनीने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण पी. आर. श्रीजेशच्या भक्कम बचावासमोर त्यांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर ललित आणि आकाशदीपने गोलची भर घालत भारताची आघाडी 5-1 अशी वाढवली. अखेरीस हरमनप्रीतने गोल करत भारताला चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.