सातारा (प्रतिनिधी) – सातारा पालिकेच्या 307 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात अनेक त्रुटी असून, त्यामध्ये अनेक चुकीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प नामंजूर करण्याची मागणी सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्याच वसंत लेवे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पालिकेच्या संगणक अभियंता अस्मिता पाटील यांनी ऑनलाइन सभेत माझा माइक जाणीवपूर्वक “म्यूट’ केला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही लेवे यांनी केली आहे.
या तक्रारी असलेले पत्र जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. या पत्रात लेवे यांनी म्हटले आहे की, सातारा पालिकेच्या 307 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला दि. 26 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली होती. अंदाजपत्रकातील तरतुदींची माहिती मिळावी, यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी विनंती मी या सभेत केली होती; परंतु मी बोलायला सुरुवात केल्यावर संगणक अभियंता अस्मिता पाटील यांनी ऑनलाइन सभेत माईक मुद्दाम बंद ठेवला. त्यामुळे मला कोणतेही प्रश्न मांडता आले नाहीत. मी सत्ताधारी आघाडीचा गेल्या वीस वर्षांपासूनचा सदस्य आहे. मला अशा प्रकारची वागणूक मिळणे अशोभनीय आहे.
पालिकेच्या अंदाजपत्रकात अनेक त्रुटी आहेत. त्यामध्ये अनेक चुकीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. गोडोली तळ्याची मालकी पालिकेकडे नसतानाही तळ्याच्या सुशोभिकरणासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रक बनविताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे सरळसरळ उल्लंघन करण्यात आले आहे. अंदाजपत्रकातील गोषवारा पत्रकच गायब असल्याने हे अंदाजपत्रक शिलकीचे की तुटीचे आहे, हे समजून येत नाही. हे अंदाजपत्रक नामंजूर करून अस्मिता पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी.