नवी दिल्ली – केंद्र सरकारने मंगळवारी अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) धडक पाऊल उचलताना 18 जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले. त्यामध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सैद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक असणाऱ्या भटकळ बंधूंचा समावेश आहे. त्याशिवाय, छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यासह कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या चार साथीदारांनाही दहशतवादी ठरवण्यात आले आहे.
कठोर मानल्या जाणाऱ्या यूएपीए अंतर्गत वर्षभरापूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जात होते. मात्र, त्या कायद्यातील महत्वपूर्ण दुरूस्तीला संसदेने ऑगस्ट 2019 मध्ये मंजुरी दिली. त्यामुळे एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 13 जणांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी ठरवण्यात आले.
आता त्या यादीत भर पडल्याने संबंधित कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्यांची संख्या 31 इतकी झाली आहे. याआधी दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्यांत दाऊद, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाजिफ सईद, जैश-ए-महंमदचा प्रमुख मसुद अजहर, खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजितसिंग पंजवार आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वाधवासिंग बब्बर आदींचा समावेश होता.
आता नव्याने दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्यांत रियाझ आणि इक्बाल भटकळ या बंधूंचा समावेश आहे. मोहम्मद अनीस शेख आणि जावेद चिकना या दाऊदच्या आणखी दोन साथीदारांना दहशतवादी ठरवण्यात आले आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात सामील अब्दुल रौफ असगर, इब्राहिम अथार आणि युसूफ अजहर यांचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
हाफिज सईदचा मेहुणा अब्दुर रहमान मक्की, साजिद मीर आणि युसूफ मुझम्मिल हे तोयबाचे म्होरके यूएपीए अंतर्गत दहशतवादी ठरले आहेत. हिज्बचा उपप्रमुख गुलाम नबी खान उर्फ आमीर खान, शाहीद लतिफ, झाफर हुसेन बट, फरहतुल्ला घोरी आणि शाहीद मेहमुद यांची नावेही दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.