पुणे – शहरात तब्बल 38 हजार कोटींची मालमत्ता असलेल्या महापालिकेला स्वत:च्या मुख्य इमारतीत स्तनदा मातांसाठी “हिरकणी’ कक्षासाठी जागा नसल्याचे रडगाणे सुरूच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांची गैरसोय होत आहे. याबाबतच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने महापालिकेस पत्र पाठवून या कक्षासाठी जागा देऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पत्राला दोन महिने झाले तरी महापालिकेने त्याला उत्तर दिलेले नाही.
मनपा मुख्य इमारतीत कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या महिला नागरिकांसाठी काही वर्षांपूर्वी गाजावाजा करुन हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. पण, गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला आहे. येथे स्तनदा मातां सुविधा तसेच अन्य महिलांसाठी विश्रांती कक्ष होता. इमारतीच्य तळमजल्यावर हा कक्ष होता. काही महिन्यांपूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरू करण्यात आला व हिरकणी कक्ष इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत कागदोपत्री हटवण्यात आला. त्या नवीन जागेची पाहणी केली असता असे दिसून आले की तेथे हिरकणी कक्षाचा बोर्ड आणि व्यवस्थाही नाही.
त्या ठिकाणी मालमत्ता विभागाच्या फाइल्स पडल्या आहेत. त्या विभागाचे दोन कर्मचारी तिथे काम करत आहेत. ही बाब समोर आल्यानंतर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगानेही तत्काळ दखल घेत महापालिकेस कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले होते.