हिंगोली (शिवशंकर निरगुडे,प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील शेतकरी कुटूबांतील तिघे सख्ये बहीण- भाऊ यांनी नियोजनबद्ध अभ्यास व परीश्रम घेत परीक्षांमध्ये अव्वल येत एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार केले आहे.
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील शेतकरी कुटूबांतील करंडे भानुदास जळबाराव यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन आखाडा बाळापुर येथील राजर्षी शाहू विद्यालय येथे शिक्षक म्हणुन विना अनुदानित शाळेत सात वर्षे विना पगारी नोकरी केली. नंतर अनुदान मिळाले. अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकविले.
तिघेही अभ्यासात नेहमी अव्वल येतं. समिक्षा भानुदास करंडे, साक्षी भानुदास करंडे व सक्षम भानुदास करंडे हे बहिण-भाऊ आखाडा बाळापुर जिल्हा परिषद प्रशालेत शिकले दोघी बहिणी दहावीपर्यंत शिकल्या तर सक्षम हा नवोदय विद्यालयात शिकला. तिघे ही अभ्यासात अव्वल असल्याने दहावीत शाळेतुन प्रथम आले होते व नंतर 12 वी मध्ये सुधा तिघांनी महाविद्यालयात अव्वल स्थान कायम ठेवलं.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
तिघांचीही एमबीबीएस साठी शासकीय कोट्यातुन निवड झाली. भानुदासराव करंडे यांची मोठी मुलगी समिक्षा करंडे हिचा बारावी नंतर २०१८ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी औरगाबाद येथे एमबीबीएस करीता नंबर लागला. यंदा तिचे एमबीबीएसचे फायनल वर्षे आहे तर दुसरी मुलगी साक्षी भानुदासराव करंडे हिचा बारावी नंतर चांगल्या गुणाणुक्रमाने एमबीबीएस करीता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडला नंबर लागला. यंदा तिचे दुसरे वर्षे आहे तर मुलगा सक्षम भानुदासराव करंडे याचा चांगल्या गुणाणुक्रमाने भारतातील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एआयआय एमएस (AIIMS)छत्तीसगढ़ येथे नंबर लागला. यंदा त्याचं पहीले वर्षे आहे.
सामान्य शेतकरी कुटूंबास शिक्षणामुळे हे यश मिळाले – करंडे
शेतकरी वडील जळबाराव मारोतराव करंडे यांनी मला शिक्षण दिले. यातुन मी शिकलो आणि शिक्षक झालो. नंतर माझ्या तिन्ही मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घेत गुणाणुक्रमाने उर्त्तीर्ण होत शासकीय कोट्यातुन वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस करीता प्रवेश प्राप्त केला. हे सगळे शिक्षणामुळे घडले असुन सर्व विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास, परिश्रम घ्यावे हमखास यश भेटून जिवन घडते. असे भानुदासराव करंडे यांनी सांगितले.
अशा प्रकारे एकाच कुटूंबातील तिघे बहिन भाऊ एमबीबीएस होउन डॉक्टर होत आहे. शिक्षणामध्ये पहिल्यापासून नियोजनबद्ध अभ्यास व कठोर परीश्रमाने हे सुयश बघावयास मिळत असल्याने या डॉक्टर होत असलेल्या तिघा बहिण भावाचे कौतुक केले जात आहे.