लखनौ – उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला सातत्याने आपले उमेदवार बदलावे लागत असल्यामुळे पक्षात सगळे ठिकठाक सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रामपुरपासून मेरठ आणि मुरादाबाद पर्यंत पक्षाने उमेदवार बदलले आहेत. (UP Lok Sabha Election 2024)
आता पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना त्यांचे काका शिवपाल यादव यांनीच मोठा झटका दिला आहे. आपण बदायूं येथून निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे संकेत शिवपाल यांनी अखिलेश यांना दिले आहेत व नव्या उमेदवाराचा प्रस्तावही त्यांनी पाठवला आहे.
शिवपाल यांना पक्षाने बदायूं येथून तिकीट दिले होते. मात्र आता गुन्नोर येथे शिवपाल यांनी एक मोठे विधान केले आहे. आदित्य यादव यांच्या बाजूने प्रस्ताव संमत झाला आहे. तो प्रस्ताव अखिलेश यांना पाठवण्यात आला आहे व त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे आदित्य यादव यांच्यासाठी प्रचार करताना खूप मजा येईल असे धर्मेंद यादव यांनीही म्हटले आहे. याचाच अर्थ शिवपाल यांच्यासोबतच धर्मेंद्र यांनीही आदित्य यांच्या निवडणूक लढण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. शिवपाल काकांसाठी प्रचार करताना थोडी अडचण वाटते मात्र आदित्यचा प्रचार अगदी जिव ओतून करणार आणि बदायूं जिंकणार असे धर्मेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
सपाचा बालेकिल्ला आहे बदायूं –
भारतीय जनता पार्टीने बदायूं येथुन खासदार संघमित्रा मौर्य यांचे तिकीट कापून ब्रज क्षेत्रातील अध्यक्ष दुर्विजय सिंह शाक्य यांना तिकीट दिले आहे. २०१९ च्या पूर्वी बदायूं समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला राहीला आहे. १९९६ पासून २०१४ पर्यंत ही जागा त्या पक्षाच्या ताब्यात होती. १९९६ ते २००४ या काळात पक्षाचे नेते सलिम इकबाल शेरवानी येथून खासदार होते. तर २००९ ते २०१४ या काळात धर्मेंद्र यादव खासदार होते.