नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना पोटाच्या संसर्गामुळे शिमल्यातील रुग्णालयातून दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी 11.20 च्या सुमारास त्यांना दिल्लीत आणण्यात आले. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची तपासणी केली जात आहे. त्यांना सौम्य ते मध्यम तीव्रतेचा स्वादुपिंडाचा दाह आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे,असे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी रात्रीपासून त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या त्यात पोटात संसर्ग आढळून आला. पोटात दुखू लागल्याने मुख्यमंत्र्यांना बुधवारी रात्री सिमल्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांचे मुख्य माध्यम सल्लागार नरेश चौहान म्हणाले की, मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवास करत होते आणि त्यांनी बाहेर काहीतरी खाल्ले असावे ज्यामुळे संसर्ग झाला.