नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लस देण्याची गती वाढवली आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या अनेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यातच आता दिल्लीच्या ‘एम्स’ने करोना प्रतिबंधक लसीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
दिल्लीच्या एम्सद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटलं की, एप्रिल-मे 2021 या कालावधीत ज्या व्यक्तीने करोनाची लस घेतली, त्यानंतर त्याला करोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नाही. हा अभ्यास इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झाला आहे.
यासंदर्भातील माहिती करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या जीनोमिक सिक्वेंन्सच्या अभ्यासातून समोर आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील आणि त्याला करोनाची लागण झाली असेल तर त्याला ब्रेक थ्रु म्हटलं जाईल.
अमेरिकेच्या हेल्थ एजन्सी, सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एँड प्रिव्हेंशनने म्हटलं की, अशा लोकांची संख्या खूप कमी आहे, ज्यांना लस घेतल्यानंतर करोनाची लागण झाली आणि रुग्णालयात दाखल करावं लागलं. तसेच लस घेतलेल्या वक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील खूपच कमी आहेत.
‘एम्स’कडून लस घेतलेल्या 63 लोकांवर अभ्यास करण्यात आला. यापैकी एकाही रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला नाही. 63 पैकी 36 जणांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर 27 जणांनी एकच डोस घेतला होता. यात 53 जणांनी कोवॅक्सिन लस घेतली होती, तर 10 लोकांना कोविशिल्ड लस घेतली.
भारतात B.1.617 व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आले होते. हे व्हेरियंट तीन कॅटेगरीत होते. B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3 या प्रकारात विभागले होते. B.1.617.2 प्रकारचा व्हेरियंट 23 लोकांमध्ये अर्थात (63.9 %) आढळून आला. यापैकी 12 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तर 11 लोकांनी एकच डोस घेतला होता. तर B.1.617.1 व्हेरियंट चार आणि B.1.1.7 व्हेरियंट एका व्यक्तीमध्ये आढळला होता.
अभ्यासातील लोकांचं सरासरी वय 37 (21-92) होते. यामध्ये 41 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश होता. या लोकांना इतर कोणतेही आजार नव्हते, ज्यामुळे करोनाची बाधा होईल.