Hijab Row : देशात मागील वर्षांपासून हिजाब घालण्याच्या मुद्दावरून वाद होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कर्नाटकमधील उमेदवारांना स्पर्धात्मक आणि भरती संबंधित परीक्षांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री एम. सी. सुधाकर (Education Minister MC Sudhakar) यांनी याविषयी माहिती समोर आली आहे.
राज्याचे शैक्षणिक धोरण आणि रिक्त पदे भरण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर सुधाकर यांनी ही माहिती दिली. ‘हिजाबचा मुद्दा चर्चेचा भाग नव्हता. काहींना छोट्या छोट्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा आहे; परंतु आम्ही लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. नीटमध्ये देखील उमेदवारांना हिजाब (Hijab) घालण्याची परवानगी आहे,’ असे मंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी ,‘मला वाटते, जे लोक विरोध करत आहेत, त्यांनी नीट परीक्षेच्या (Exam) मार्गदर्शक तत्त्वांची पडताळणी केली पाहिजे. मला माहीत नाही की ते यातून मुद्दा का काढत आहेत. परीक्षेसाठी जे हवे ते परिधान करण्याचा अधिकार आहे. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोक त्यांना हवे तसे कपडे घालण्यास मोकळे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा निर्णय इतर संस्थांसह पाच महामंडळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी कर्नाटकात होणाऱ्या परीक्षांनाही लागू होईल, असे समजते. मागील वर्षी उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या सहा मुलींना वर्गात जाण्यापासून रोखल्यानंतर मुलींनी विरोध केला होता. त्याचा उद्रेक कर्नाटकात झाला होता. काही हिंदू विद्यार्थ्यांनीही (Hindu Students) भगवा स्कार्फ घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आणि लवकरच ही समस्या राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये पसरली.