Truck Drivers Protest : केंद्र सरकारने नव्याने केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात राज्यात सध्या ट्रक- टँकर चालक संपावर गेले आहेत. या संपाचा फटका एसटीच्या वाहतुकीवरही होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता एसटीने याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रक- टँकर चालकाचा संपात लालपरीकडे मुबलक असा इंधन साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस एसटी आपल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात ट्रक- टँकर चालक संप सुरु असला तरी नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी दहा दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत धावू शकते असे म्हटले जात आहे. या संदर्भात एका वृत्त वाहिनीने माहिती दिली आहे. एसटी बससाठी लागणारे डिझेल सध्या ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एसटी प्रशासनाने पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे.
एसटी बसेससाठी विदर्भात रोज दोन लाख लिटर डिझेल लागते. सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यामुळे तीन दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी स्थिती असल्याचे गभने म्हणाले. मात्र, नागपूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढेच डिझेल साठा असल्याने नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
इंडियन ऑइल कार्पोरेशन (IOC) व भारत पेट्रोलियम (BPCL) या दोन पेट्रोल केमिकल कंपन्यांच्या कडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. सर्व आगारात आजच्या दिवस पुरेल इतका डिझेल साठा सध्या आहे. तर संप आणखीन काही दिवस चालल्यास डिझेलचे कमतरता भासून बस फेऱ्या रद्द होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. सध्या राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये कमीत कमी दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवासाचा माध्यम असलेल्या एसटीची चाके थांबतील अशी चिन्हे आहेत.