Entertainment : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता दिग्पाल लांजेकर यांनी ‘मुक्ताई’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची माहिती देत दिग्पाल यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “नवे क्षितीज …. नवे सीमोल्लंघन… कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई. तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा!”. दिग्पाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विठूरायाची मूर्ती दिसत आहे. या पोस्टनंतर अनेकांनी दिग्पाल यांच्या या आगामी चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
मुक्ताई हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार आहेत. याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, याआधी दिग्पाल लांजेकर ‘फर्जंद’, फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘सुभेदार’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता त्यांचा ‘मुक्ताई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.